28 मे म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म दिवस.


स्वातंत्र्यवीर  सावरकर यांना 1910 मधे जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेचा कालावधी होता पन्नास वर्षे  आणि त्या वेळेस त्याचे वय होते अवघे २७ वर्षांचे! 


अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर  सावरकरांनी त्यासंदर्भात माझी जन्मठेप हे आत्मचरित्र लिहिले आहे. हे आत्मचरित्र वाचताना त्यांचे झालेले हाल आणि त्यांच्यावर केलेले अमानुष अत्याचार वाचून अंगावर अक्षरशः काटा येतो! 

त्यानुसार, सूर्यास्ताला  कैद्यांना एकदा का कोठडीमध्ये बंद केले की पुढील बारा तास शौचास वा लघवीला जाण्यासाठीदेखील  मनाई होती! आणि जर कैद्याला  हे पाळणे शक्य झाले नाही तर  दुसऱ्या दिवशी तो मल त्याला स्वतःच्या हाताने काढावा लागे! शिवाय त्याबद्दल  मारहाणही होई, ती वेगळीच! शिव्या देत, अपमान करत, कधीकधी पूर्ण तीन-चार दिवस बेड्या घातलेल्या अवस्थेत राहण्याची शिक्षा दिली जाई! ही अमानुष पद्धत बंद व्हावी यासाठी  अगदी गृहमंत्र्यांपर्यंत  तक्रारअर्ज  करावे लागले! 

जेवणाच्या बाबतीतही अत्याचार होत होते. फक्त एक वाडगा भात, वरण किंवा भाजी आणि दोन गव्हाच्या पोळ्या आणि कांजी देत.  यातला जाचक नियम म्हणजे वाढलेल्या अन्नाव्यतिरिक्त एक कणही अधिक मिळत नव्हता आणि कोणत्याही कारणाने यत्किंचितही अन्न टाकून द्यायला परवानगी नव्हती! अन्नाच्या दर्जाची तर गोष्टच काढायला नको! 


रोज सातशे ते आठशे लोकांचा स्वयंपाक होत असे. स्वैपाकीही गुप्तरोग झालेले, घामट कपडे घातलेले, डोक्याचा घाम स्वैपाकाच्या भांड्यात टप टप पडत असूनही  काळजी न घेणारे  होते. असे घामट अन्न मिटक्या मारून खावे लागे! 

सकाळी कांजी देत त्यात  घासलेट पडत असे पण तरीही तशीच खावी लागे.

 शिवाय, पाऊस असो की ऊन, सगळ्या कैद्यांना उभे राहून उघड्यावरच हे अन्न ग्रहण करावे लागे. आडोसा पाहून बसणे सुद्धा चालत नव्हते . जेवताना  पावसाळ्यात ताटामध्ये  पाणी पडत असे पण तरीही ते बिनबोभाट तसेच खावे लागे. कधीकधीतर पाणी पडल्याने ताटात अन्नही उरत नसे पण तरीही तक्रार केलेली चालत नसे. 


सकाळी सकाळी काही बंदिवानांना भाजी आणण्यासाठी रानात पाठवत. रानामध्ये  पालेभाज्यांबरोबर कापलेले गोम आणि साप सुद्धा येई. भाजी खातानाच ते  समजे! असे आढळले  तरीही ते तसेच खाणे सक्तीचे होते. 


ठराविक वेळेतच जेवण संपवावे लागे. अन्यथा वॉर्डनच्या हाताचा  सपासप मार खावा लागे. वॉर्डन अर्धवट जेवण झाले असले तर उरलेल्या अन्नाच्या थाळ्या तशाच  भिरकावून देत.

हे  काहीच नाही असे वाटावे अशी गोष्ट म्हणजे  सहा सहा महिने भोगावा लागणारा एकांतवास! हातात बेड्या घालून आठवडाभर उभे राहण्याची शिक्षा, अनेक महिने अंधार कोठडी, दोरखंड विणणे,  घाणा चालवणे, जो अन्यथा बैल चालवतो. त्यातून दिवसाला 30 पौंड तेल काढणे, सतत मारपीट, शिव्या. मारणे तरी कसे?  उदा. शेंडी इतक्या जोरात उपटत  की ती तुटून हातात येत असे! असा छळ करण्यासाठी खास बलुची, पंजाबी मुसलमान ठेवलेले होते! 


सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा तिथे 1857 च्या स्वातंत्र्य युद्धातील  काही कैदी तर  60 वर्षांची शिक्षा भोगून त्यांना परत पाठवले होते ! त्यांची नावे सुद्धा आज आम्हाला माहीत नाहीत.


असे स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्योत्तर काळात घाणेरड्या राजकारणाचे बळी ठरावेत यापेक्षा अधिक कोणती शोकांतिका असू शकते! त्यांच्यावरच्या भयानक शिक्षेचा विचार करून त्यांचा मानसन्मान होणे तर दूरच पण केवळ  विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांचे चारित्र्यहनन व्हावे ही गोष्ट या देशासाठी अत्यंत लाजिरवाणी आहे! अशा कुजकट मनोवृत्तीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे! 

भारतमातेच्या या थोर वीरपुरुषापुढे कृतज्ञतेने नतमस्तक होऊन त्यांच्या जीवनातली तत्त्वनिष्ठा आपल्या जीवनात थोडीजरी आणता आली तर ते त्यांना केलेले  योग्य अभिवादन ठरेल!

Comments

Popular posts from this blog